पुणे :



महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या तिकीटवाटपाच्या निर्णयांमुळे पक्षांतर्गत नाराजीचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ज्येष्ठ नगरसेवक व दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे डावलण्यात आल्याने राज्यभर असंतोष पसरला असून, पुण्यात ही नाराजी अधिक तीव्र झाली आहे. पुणे महानगरपालिकेत तब्बल ४२ विद्यमान नगरसेवकांना संधी नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात हा रोष उघडपणे समोर आला. भाजपच्या झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष युवराज कुचेकर यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “पक्ष आम्ही वर्षानुवर्षे वाढवला, तरीही निष्ठावंतांना बाजूला सारून बाहेरून आलेल्या उमेदवारांना पुढे आणण्यात आलं,” असा आरोप त्यांनी केला.
तिकीटवाटपाच्या निर्णयाबाबत जबाबदारी एकमेकांकडे ढकलली जात असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. न्याय मागण्यासाठी प्रयत्न करूनही समाधान न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि संताप दाटल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर युवराज कुचेकर यांचा संतप्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पक्ष नेतृत्वाने वेळीच नाराजी दूर केली नाही, तर याचा निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

















