पुरुष दात्यांची संख्या अधिक

* पुणे विभागात अवयवदानातून शेकडो रुग्णांना नवे आयुष्य

पुणे :

अवयवदानाच्या क्षेत्रात पुणे विभागाने भक्कम पाऊल टाकले असून, महिलांच्या तुलनेत पुरुष दात्यांचा सहभाग अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी)च्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या एक वर्षात ७९ मेंदूमृत दात्यांच्या नातेवाइकांनी अवयवदानास संमती दिली. यामध्ये ५७ पुरुष (७२ टक्के) तर २२ महिला (२८ टक्के) दाते होते.
झेडटीसीसी पुणेच्या कार्यामुळे अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार सर्वाधिक ११७ मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. त्यानंतर ६७ यकृत, १३ फुफ्फुस आणि ४ हृदय प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले आहेत. याशिवाय हृदय-फुफ्फुस, मूत्रपिंड-हृदय तसेच मूत्रपिंड-स्वादुपिंड अशी संयुक्त प्रत्यारोपणही करण्यात आली असून त्यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मेंदूमृत्यूच्या कारणांचा विचार करता २८ दात्यांचा मृत्यू अपघात अथवा गंभीर दुखापतीमुळे झाला, तर उर्वरित ५१ दाते आजारपण किंवा अन्य कारणांमुळे मेंदूमृत ठरले. विशेष बाब म्हणजे यावर्षी एका परदेशी महिलेनेही पुण्यात अवयवदान करून मानवतेचा संदेश दिला.
झेडटीसीसीच्या सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, अनेक कुटुंबे अवघड क्षणीही जीवनदानाचा निर्णय घेत आहेत. या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळत असून पुणे विभाग अवयवदानाच्या चळवळीत आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा   निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा ; पुण्यात कनिष्ठ अभियंत्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई