दक्षिण कोरियातील जागतिक तायक्वांदो स्पर्धेत पुण्याचे खेळाडूंची चमकदार कामगिरी

पुणे :

दक्षिण कोरियातील मुजू येथे नुकत्याच झालेल्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेत (वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपो चॅम्पियनशिप – डब्ल्यूटीसीई) पुण्यातील आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुजू येथे झालेल्या स्पर्धेत संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य, तर इंचॉन येथे झालेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक तायक्वांदो फेडरेशनच्या वतीने झालेल्या स्पर्धेत सहा रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकून भारताचा गौरव वाढवला.

मुजूमध्ये झालेल्या स्पर्धेत पूमसे आणि क्योरोगी प्रकारात मंथन देवी व कृती दवे हिने यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्य, आर्वी गवरे हिने दोन कांस्य, कल्याणी डफळ हिने एक सुवर्ण व एक कांस्य, तर प्रांजल पानसे हिने एक रौप्य व एक कांस्य पदक जिंकले. इंचॉन येथे झालेल्या स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी करीत पूमसे आणि क्योरुगी प्रकारात मंथन देवी हिने दोन रौप्य, कृती दवे हिने एक रौप्य व एक कांस्य, आर्वी गवरे हिने एक रौप्य व एक कांस्य, कल्याणी डफळ हिने एक रौप्य व एक कांस्य, प्रांजल पानसे हिने एक रौप्य व एक कांस्य पदक पटकविले.

या स्पर्धेत एकूण २८ देशांनी सहभाग घेतला होता. ‘डब्ल्यूटीसीई’ स्पर्धेत ३,००० हून अधिक, तर ‘डब्ल्यूओटीएफ’ स्पर्धेत २,३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपोच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आयोजित या स्पर्धेला अनेक देशांतील ‘ग्रँड मास्टर्स’ उपस्थित होते. सारंग ढोका, योगेश मुदलियार, श्रीनिवास केडगोनी, तनिष्क बांगर, क्रिश केडगोणी, बसवराज भंडारी, आदिनाथ कुदळे, राजेंद्र साळुंखे, विशाल गावटे, स्वाती भंडारी यांच्यासह पालकांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.

संपूर्ण आंतरराष्ट्रीय दौरा, संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंचे प्रशिक्षण यांचे नेतृत्व मास्टर रवींद्र भंडारी यांनी केले. समारोपावेळी आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर रवींद्र भंडारी यांना मुख्य मंचावर आमंत्रित करीत तायक्वांदोच्या प्रसारासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि त्यांच्या संघाच्या नेत्रदीपक यशाबद्दल ‘विशेष प्रशंसा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्टता, शिस्त आणि गुणवत्तेप्रती असलेल्या निष्ठेमुळे या असोसिएशनला भारतातील सर्वोत्तम तायक्वांदो संघांपैकी एक म्हणूनही गौरवण्यात आले. सर्व यशस्वी खेळाडूंचा ‘सेंट फेलिक्स स्कूल’तर्फे सत्कार करण्यात आला.

आणखी वाचा   पीएमपी बसमध्ये रील शूटिंगवर कडक कारवाई ; विनापरवाना व्हिडीओ काढणाऱ्यांना दंडाचा इशारा