पीएमपी बसमध्ये रील शूटिंगवर कडक कारवाई ; विनापरवाना व्हिडीओ काढणाऱ्यांना दंडाचा इशारा

पुणे –

सोशल मीडियासाठी रील बनविण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे आता सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये प्रवाशांना गैरसोय होईल अशा पद्धतीने आणि प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता रील व व्हिडीओ शूटिंग केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी संताप व्यक्त करत अशा प्रकारांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
पीएमपी बस ही प्रवाशांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी असून, ती वैयक्तिक मनोरंजन किंवा सोशल मीडिया कंटेंटसाठी वापरू नये, अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे. चालत्या बसमध्ये स्टंट करणे, इतर प्रवाशांचा चेहरा किंवा खासगीपणाचा भंग होईल असे व्हिडीओ चित्रीकरण करणे हे कायद्याने गुन्हा ठरू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पीएमपी प्रशासनाच्या माहितीनुसार, बसच्या आत कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक अथवा सोशल मीडिया शूटिंग करायचे असल्यास अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना शूटिंग करताना आढळलेल्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल. आवश्यक अटी-शर्ती व शुल्क भरूनच शूटिंगसाठी परवानगी दिली जाईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना प्रवाशांनी शिस्त पाळावी, नियमांचे उल्लंघन टाळावे आणि बसमध्ये मोबाईल कॅमेरा वापरण्यापूर्वी परवानगी आहे का, याचा विचार करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा   मंडई मेट्रो स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव; माळी महासंघाचा ढोल-ताशांत जल्लोष