हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग अंतिम टप्प्यात

* मार्चअखेर पुणेकरांना दिलासा

पुणे :

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या माण–हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गाने निर्णायक टप्पा गाठला आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) माण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक) दरम्यान १९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, उर्वरित काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

२३ किलोमीटर लांबीच्या या पूर्णतः एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झाले होते. सध्या बहुतांश मार्गावर मेट्रो धावण्यासाठी सज्ज असून, काही ठिकाणी स्थानकांची अंतिम कामे सुरू आहेत. २३ पैकी १९ किलोमीटरवर चाचणी यशस्वी ठरल्याने केवळ सुमारे पाच किलोमीटरचा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. हा टप्पा वेळेत पूर्ण झाल्यास काही निवडक स्थानके वगळता संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.

बाणेर–हिंजवडी रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली तीव्र वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी मोठी समस्या ठरली आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून, इंधनाची बचत आणि प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पांतर्गत आचार्य आनंदऋषीजी चौकात उभारण्यात येत असलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या खालच्या स्तरावर दुहेरी वाहतुकीची सोय करण्यात आली असून, वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका आहे. औंध ते शिवाजीनगर दिशेने जाणारी एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याने त्या दिशेतील कोंडीत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, शिवाजीनगरहून औंध, बाणेर व पाषाणकडे जाणाऱ्या प्रवाशांना पूर्ण काम होईपर्यंत आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आणखी वाचा   जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षांतरांचा महापूर