पुणे :



प्रवाशांची वाट पाहत टर्मिनल परिसरात दीर्घकाळ वाहन उभी करणाऱ्या चालकांना आता आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे विमानतळ प्रशासनाने ‘ड्वेल टाइम’ (थांबा कालावधी) नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
विमानतळ परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. टर्मिनलमध्ये दररोज सुमारे १५ हजारांहून अधिक चारचाकी वाहने ये-जा करतात. अनेक वाहनचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत तासन्तास थांबत असल्याने टर्मिनलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आणि अडथळे निर्माण होतात. विशेषतः रात्रीच्या सत्रात विमानांची संख्या वाढल्याने कोंडीची समस्या तीव्र होते. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या हालचालीवर होत आहे.
‘एनपीआर’ कॅमेऱ्यांद्वारे नजर
नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टर्मिनल परिसरात सहा ‘एनपीआर’ (नंबर प्लेट रेकग्निशन) कॅमेरे बसविण्यात आले आहेत. टर्मिनलमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाणार आहे. संबंधित वाहनाने परिसरात किती वेळ घालवला, याची अचूक नोंद प्रणालीकडे राहील.
१५ मिनिटांपेक्षा जास्त कालावधी थांबलेल्या वाहनांची माहिती स्वयंचलित पद्धतीने यंत्रणेला पाठविली जाईल आणि त्यानंतर संबंधित वाहनचालकाकडून निश्चित दंड वसूल केला जाईल. दंडाची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
वाहतूक सुरळीत करण्यावर भर
या निर्णयामुळे टर्मिनल परिसरातील अनावश्यक थांबे कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. तसेच गुन्हेगारी प्रकरणांत वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवणेही सोपे होणार आहे.
दृष्टिक्षेपात – पुणे विमानतळ
दैनंदिन चारचाकी वाहने : सुमारे १५ हजार
दैनंदिन विमानांची संख्या : सुमारे २००
दैनंदिन प्रवासी संख्या : सुमारे ३५ हजार
पार्किंग बे : १०
एरोब्रिज : १०
वाढत्या प्रवासी संख्येमुळे आणि वाहनांच्या दबावामुळे टर्मिनल परिसरातील शिस्तबद्ध वाहतूक हीच काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

















