नियमभंगामुळे रखडलेल्या स्थानिक निवडणुका अखेर मार्गी

* २४ नगरपालिका, ४ नगरपंचायतींसह १५४ जागांसाठी २० डिसेंबरला मतदान

पुणे –

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्माण झालेला प्रशासकीय व न्यायालयीन अडसर दूर झाला असून, स्थगित ठेवलेल्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. नियमबाह्य पद्धतीने चिन्हवाटप झाल्याचे स्पष्ट करत आयोगाने यापूर्वी संबंधित ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती.

४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानंतर काही ठिकाणी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रांवरील निर्णयांविरोधात न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, या अपील प्रकरणांचा निकाल येण्यापूर्वीच उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक मुदत न देता निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ही प्रक्रिया निवडणूक नियमांच्या विरोधात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्ष, सदस्य तसेच काही ठिकाणी केवळ सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ जिल्ह्यांतील २४ नगरपालिका व ४ नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्वच ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची तयारीही वेग घेणार आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीची धामधूम अधिकच वाढली आहे.

आणखी वाचा   राघवेंद्र मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताने आले निवडून