पुणे –




मेट्रो प्रवासादरम्यान स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मेट्रोमध्ये फक्त सीलबंद (वेष्टनाधारित) शिजवलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थ नेण्यास परवानगी असून, कच्चे मांस, उघडे मांसाहारी पदार्थ तसेच सुकट व इतर सुकी मासळी बाळगण्यास सक्त मनाई आहे.
महामेट्रोने स्पष्ट केले आहे की, शिजवलेले अन्न डब्यात किंवा सीलबंद स्वरूपात नेणे मान्य असले, तरी प्रवासादरम्यान अन्नसेवन करण्यास पूर्ण बंदी आहे. मेट्रो डबे पूर्णतः वातानुकूलित व बंद स्वरूपाचे असल्याने अन्नाचा वास पसरून इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो, तसेच अस्वच्छतेचा धोका निर्माण होऊ शकतो.
हे नियम पूर्वीपासून अस्तित्वात असले, तरी अनेक प्रवाशांना याची पुरेशी माहिती नसल्याने तपासणीदरम्यान वादाचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) ने निषिद्ध वस्तूंची यादी पुन्हा एकदा जाहीर केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो प्रवास करण्यास मज्जाव केला जात आहे.
महामेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी नियमांची माहिती घ्यावी आणि सहप्रवाशांच्या सोयीसाठी त्यांचे काटेकोर पालन करावे. मेट्रो प्रवास सुरक्षित, स्वच्छ आणि वादविरहित ठेवण्यासाठी प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचेही प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

















