प्रेमाच्या ‘गगनभरारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

* व्हॅलेंटाइन डे निमित्त पुण्यात हेलिकॉप्टर जॉय राइड

पुणे –

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शहरात प्रेमाला अक्षरशः ‘गगनभरारी’ मिळाली. विविध एव्हिएशन कंपन्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर जॉय राइड उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच हेलिपॅडवर वेगळीच लगबग दिसून आली होती. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी अनेकांनी या हवाई सफरीचा आनंद घेतला.

शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून हेलिकॉप्टरची उड्डाणे सुरू झाली. बिबवेवाडी व लोणीकंद येथून प्रत्येकी एक अशा दोन हेलिकॉप्टरद्वारे सुमारे २० हून अधिक फेऱ्या पार पडल्या. या माध्यमातून शंभरहून अधिक प्रवाशांना शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक राइड सात ते दहा मिनिटांची असून सुमारे दीड हजार फूट उंचीवरून पुण्याचे नयनरम्य दृश्य अनुभवता आले.

या उपक्रमासाठी ‘बेल ४०७’ आणि एअरबसचे ‘एच १२५’ या प्रकारच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. प्रति प्रवासी पाच ते सात हजार रुपयांदरम्यान शुल्क आकारण्यात आले. सामान्य नागरिकांसाठी एरव्ही महाग ठरणारी हेलिकॉप्टर सफर या निमित्ताने तुलनेने सुलभ दरात उपलब्ध झाली.

दिव्यांग मुलांसाठी विशेष उपक्रम

व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत ‘ओपन युअर आईज’ (ओवायई) फाउंडेशन आणि ‘महालक्ष्मी एव्हिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५ दिव्यांग मुलांसाठी विशेष हेलिकॉप्टर सफरीचे आयोजन करण्यात आले. डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या उपक्रमामुळे मुलांना आकाशात झेप घेण्याचा आनंद अनुभवता आला. हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा होता. महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

प्रेमाचा नवा अनुभव

या जॉय राइडसाठी केवळ प्रेमी युगुलच नव्हे, तर अनेकांनी आपल्या आई-वडिलांसाठी तसेच कुटुंबीयांसाठीही बुकिंग केले होते. हवाई सफरीनंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होता.

आकाशातील ही अल्पावधीची सफर अनेकांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव ठरली. प्रेमाच्या दिवसाला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

आणखी वाचा   पुण्यात विद्यार्थ्याचा क्लासमध्ये मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश