पुणे :



शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर विषय बनला आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या चिमुकल्यांपर्यंत अनेक जण श्वानांच्या आक्रमक वर्तनाला सामोरे जात आहेत. रात्री उशिरा दुचाकीवरून घरी परतणाऱ्या तरुणांचा पाठलाग करणे, वाहनांमागे धाव घेणे आणि अचानक झडप घालणे या प्रकारांत वाढ झाल्याची तक्रार विविध भागांतून येत आहे.
दरमहा सुमारे ९०० जणांना श्वानदंश
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात दरमहा सरासरी ९०० हून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांकडून चावा घेतला जातो. पूर्वी मुख्य रस्त्यांपुरत्या मर्यादित असलेल्या घटना आता गृहनिर्माण सोसायट्या, शाळांच्या परिसरात आणि अंतर्गत रस्त्यांवरही घडू लागल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्वानसंख्या नियंत्रणाबाहेर?
महापालिकेने २०२३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात शहरात सुमारे १ लाख ८० हजार भटके श्वान असल्याचा दावा केला होता. मात्र, नव्याने ३२ गावांचा समावेश आणि शहराचा झपाट्याने वाढता विस्तार लक्षात घेता प्रत्यक्ष संख्या दोन ते तीन लाखांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर टाकला जाणारा उघडा कचरा आणि काही नागरिकांकडून नियमित खाऊ घालण्याच्या सवयीमुळे श्वानांची संख्या वाढीस लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नसबंदी मोहिमा अपुऱ्या ठरत असल्याची टीका
महापालिकेकडून भटक्या श्वानांची नसबंदी व अँटिरेबीज लसीकरण मोहिम राबविली जाते. कात्रज, नायडू रुग्णालय, बाणेर, केशवरनगर, वडकी आणि होळकरवाडी येथे नसबंदी केंद्रे कार्यरत असून दररोज ६० ते १८० श्वानांवर शस्त्रक्रिया केली जाते. तरीही वाढत्या संख्येच्या तुलनेत ही मोहीम अपुरी ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
श्वान पकडण्यासाठी अपुरी मनुष्यबळ
पालिकेकडे श्वान पकडण्यासाठी १३ वाहने असून त्यापैकी ९ महापालिकेची तर उर्वरित स्वयंसेवी संस्थांची आहेत. एकूण ४० ते ५० कर्मचारी या कामासाठी कार्यरत असल्याचे सांगितले जाते; मात्र श्वान पकडण्यासाठी कोणतेही निश्चित लक्ष्य नसल्याने कार्यवाही संथ गतीने होत असल्याची टीका होते.
शेल्टर उभारणीची प्रक्रिया सुरू
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय संस्था, शाळा आणि न्यायालय परिसरातील भटक्या श्वानांवर नसबंदी करून त्यांना शेल्टरमध्ये हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर श्वानांसाठी पुरेशी निवारा व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. सध्या नवीन शेल्टर उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, “सोसायट्यांमध्ये काही जण भटक्या श्वानांना नियमित खाऊ घालतात. त्यामुळे त्यांची वर्दळ वाढते आणि ते अधिक आक्रमक होतात. महापालिकेने ठोस आणि तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया सूस परिसरातील रहिवासी प्रदीप कांबळे यांनी दिली.
शहरातील वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी सर्वसमावेशक, दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण राबविण्याची मागणी आता जोर धरत आहे.
















