माजी नगरसेवक विशाल तांबे यांची निवडणुकीतून माघार

पुणे –

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अनपेक्षित धक्का बसला आहे. धनकवडी परिसराचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

२००७ पासून महापालिकेत सक्रिय असलेले तांबे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटात राहिले होते. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी, अशी त्यांची भूमिका पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत ठरली. शहराध्यक्षांनी आघाडी नाकारल्यानंतर निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर तांबेंनी राजकीय प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

आपल्या निर्णयाची माहिती देताना तांबेंनी धनकवडी परिसरात वितरित केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या राजकारणात पद आणि प्रतिष्ठेपेक्षा आत्मसमाधान अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहे. वाढत्या अपेक्षा आणि बदलत्या राजकीय संस्कृतीत स्वतःहून मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणातून माघार घेत असले तरी समाजकारण आणि निस्वार्थ सेवेचा वसा पुढे सुरूच राहील, असा शब्द तांबेंनी दिला आहे. शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांतून समाजासाठी काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा   इंस्टाग्रामवरील ओळखीचा सापळा ठरला जीवघेणा; १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या