इंस्टाग्रामवरील ओळखीचा सापळा ठरला जीवघेणा; १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

पुणे :

सोशल मीडियावरून ओळख वाढवत एका अल्पवयीन तरुणाला भेटीसाठी बोलावून घेऊन त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमनसिंग गचांड (वय १७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील आरोपी उत्तमनगर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस तपासानुसार, काही दिवसांपूर्वी अमनसिंग आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी खुनाचा कट रचल्याचा संशय आहे. तपासात असे समोर आले आहे की, एका मुलीच्या माध्यमातून अमनसिंगला इंस्टाग्रामवर संपर्क साधण्यात आला आणि भेटीच्या बहाण्याने त्याला बाहेर बोलावण्यात आले.

२९ डिसेंबर रोजी अमनसिंग घरातून बाहेर पडला. आरोपींनी त्याला प्रथम कात्रज परिसरात बोलावून घेतले आणि त्यानंतर खेडशिवापूर परिसरात नेले. तेथे दगड व कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पाणी अडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चारीत त्याचा मृतदेह पुरून टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, अमनसिंगवर चार महिन्यांपूर्वी एका व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या वैमनस्यातूनच हा खून झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.

या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी काही संशयितांची नावे व त्यांचे मोबाईल क्रमांक पोलिसांकडे दिले होते. मात्र, संबंधित संशयितांना चौकशीसाठी तत्काळ बोलावण्यात आले नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

आणखी वाचा   पुणेकर सुज्ञ आहेत, मतपेटीतून योग्य उत्तर देतील’ – केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ