होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची मोठी तयारी; पुण्याहून नागपूर, दानापूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

पुणे :

होळी सणानिमित्त उत्तर भारत व विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून नागपूर, दानापूर आणि गोरखपूर या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एकूण ४८ अतिरिक्त फेऱ्यांमधून सुमारे एक लाख वीस हजार प्रवाशांची सोय होणार असून काही गाड्यांमध्ये वातानुकूलित डब्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत विविध टप्प्यांत या विशेष गाड्या धावणार आहेत. काही गाड्या ‘विशेष रेल्वे’ तर काही ‘होळी विशेष’ म्हणून चालवण्यात येणार असून प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

नागपूरसाठी विशेष फेऱ्या

पुणे–नागपूर–पुणे दरम्यान वातानुकूलित आणि साप्ताहिक विशेष गाड्या धावणार आहेत. पुण्याहून दुपारच्या सुमारास सुटणाऱ्या गाड्या दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला पोहोचतील, तर नागपूरहून सकाळी सुटणाऱ्या गाड्या रात्री उशिरा पुण्यात दाखल होतील. या गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

दानापूरकडे द्वि-साप्ताहिक व दररोज सेवा

पुणे–दानापूर मार्गावर द्वि-साप्ताहिक तसेच दररोज विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्याहून सायंकाळी सुटणाऱ्या गाड्या तिसऱ्या दिवशी सकाळी दानापूरला पोहोचतील. परतीच्या गाड्या दानापूरहून सकाळी सुटून पुढील दिवशी पुण्यात दाखल होतील. या मार्गावर अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आदी स्थानकांवर थांबे असतील.

गोरखपूरसाठी ३२ फेऱ्या

पुणे–गोरखपूर मार्गावर ३२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पुण्याहून सकाळी सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी गोरखपूरला पोहोचेल, तर गोरखपूरहून सायंकाळी सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे पुण्यात दाखल होईल. या गाड्यांना दौंड कॉर्ड, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होळीच्या कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आणखी वाचा   पुणेकरांनी विचार पूर्वक मतदार करावे