* उद्यापासून हॉल तिकिटे उपलब्ध



पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेच्या तयारीला वेग दिला आहे. मंडळाच्या जाहीर वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा येत्या १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, उद्यापासून बारावीची हॉल तिकिटे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असून, संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याचे प्रिंटआऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावेत, असे निर्देश राज्य मंडळाने दिले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
मंडळाने स्पष्ट केले आहे की, हॉल तिकीट ग्राह्य धरण्यासाठी त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का अनिवार्य असेल. हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचा फोटो असणे आवश्यक असून, त्यावर अधिकृत स्वाक्षरी केल्यानंतरच ते वैध मानले जाईल. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
दरम्यान, लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहेत. एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
यंदाच्या फेब्रुवारी–मार्च २०२६ मधील बारावीच्या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची रणधुमाळी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे.

















