पुणे :



वैद्यकीय उपचारांसोबतच कायदेशीर तपास आवश्यक असलेल्या ‘मेडिको-लीगल केस’ (एमएलसी) रुग्णांची संख्या सतत वाढत असून ससून रुग्णालयावर मोठा ताण पडत आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, दरवर्षी ससूनच्या बाह्यरुग्ण विभागात सुमारे साडेचार लाख रुग्ण उपचार घेतात, त्यापैकी 70 हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होतात आणि यातील 30 ते 32 हजार रुग्ण एमएलसी प्रकरणात मोडतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वाढती वाहतूक, अपघातांची वाढ, कौटुंबिक व सामाजिक वाद, तसेच मानसिक ताण-तणाव या घटकांमुळे अशा प्रकरणांमध्ये सतत वाढ होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस अपघात आणि मारहाणीच्या घटनांमुळे आपत्कालीन विभागावर अतिरिक्त दबाव येतो.
वैद्यकीय कायदेशीर प्रकरणांमध्ये रस्ते अपघात, मारहाण, विषप्रयोग, आत्महत्येचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार अशा घटनांचा समावेश होतो. या रुग्णांवर उपचार करताना फक्त वैद्यकीय प्रक्रियाच नव्हे तर पोलिसांसोबत संवाद, सविस्तर अहवाल तयार करणे, आणि गरज पडल्यास न्यायालयात साक्ष देणे ही जबाबदारीही डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांवर येते.
दररोज ससून रुग्णालयात 45 ते 47 मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात, तर किरकोळ शस्त्रक्रियांची संख्या दिवसाला सुमारे 150 असून वर्षभरात ही 50 ते 55 हजारांच्या जवळ पोहोचते.
डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय म्हणतात, “वाढत्या एमएलसी प्रकरणांमुळे मनुष्यबळ आणि यंत्रणांवर अतिरिक्त दबाव आहे. प्रत्येक प्रकरणात कायदेशीर कागदपत्रे अचूक आणि वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. जर इतर शासकीय रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात एमएलसी प्रकरणे वर्ग केली गेली, तर ससूनवरील ताण निश्चितपणे कमी होऊ शकेल.”

















