प्रभाग ७ मध्ये तरुणाईचा राजकीय प्रवेश, २४ वर्षीय अंजली ओरसे राष्ट्रवादीकडून मैदानात

* सर्वात कमी वयाची उमेदवार असल्याची चर्चा

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे. अवघ्या २४ वर्षांच्या अंजली ओरसे हिने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, ती या निवडणुकीतील सर्वात कमी वयाची उमेदवार ठरली आहे. तिच्या उमेदवारीमुळे प्रभागासह संपूर्ण शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
माजी नगरसेवक विनोद ओरसे यांच्या उपस्थितीत आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या गर्दीत अंजलीने अर्ज सादर केला. गोखलेनगर परिसरातील रहिवासी म्हणून ओळख असलेल्या अंजलीने गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील विकासकामे, नागरी समस्या आणि स्थानिक प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते.
सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित विकास न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा सूर व्यक्त करत, “प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लावणे आणि मूलभूत सुविधा सक्षम करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे अंजली ओरसे हिने स्पष्ट केले. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून, जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत तरुण नेतृत्वाला मतदार किती संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रभाग क्रमांक ७ मधील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणखी वाचा   बारावी परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात