* पुण्याच्या राजकारणात खळबळ



पुणे :
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने उमेदवार निवडीची कठोर छाननी सुरू केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मागील अनेक वर्षे निवडणुकीची तयारी करत असलेल्या आणि प्रभागांमध्ये सक्रिय असलेल्या अनेक माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर न झाल्याने नेमकी संख्या स्पष्ट नसली तरी ३० ते ४० माजी नगरसेवकांचा ‘पत्ता कट’ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महापालिकेचे सभागृह विसर्जित झाल्यानंतर निवडणूक कधी होणार, याकडे माजी नगरसेवकांचे लक्ष लागले होते. या कालावधीत मतदारांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी अनेकांनी वैयक्तिक खर्चातून सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रम राबवत आपली उपस्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक जाहीर होताच भाजपमधील माजी नगरसेवक जोमाने तयारीला लागले होते.
केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपची उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास अनेक इच्छुकांमध्ये होता. त्यामुळे इतर पक्षांतील नेत्यांचाही भाजपकडे ओढा वाढला आणि अनेकांनी प्रवेश केला. आयारामांसह पक्षातील माजी नगरसेवकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. मात्र अंतिम टप्प्यात पक्षाने कठोर भूमिका घेत अनेकांना डावलल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमोल बालवडकर, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, राजश्री नवले, नीता दांगट, आरती कोंढरे, मनीषा कदम, जयंत भावे, स्वाती लोखंडे, शंकर पवार, प्रकाश ढोरे, गायत्री खडके, राजश्री काळे, राजेश ऐनपुरे, सुनीता गलांडे, संदीप जऱ्हाड, वृषाली चौधरी, अर्चना मुसळे यांच्यासह इतर काही माजी नगरसेवकांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
पक्षाकडून डावलल्याची चाहूल लागताच काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली, तर काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नगरसेवक पदाच्या कार्यकाळात प्रभावी कामगिरी न करणे, निवडणूक काळात पक्षाच्या जबाबदाऱ्या पार न पाडणे, तसेच स्थानिक आमदारांशी मतभेद हे उमेदवारी कापण्यामागचे प्रमुख निकष ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

















