एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीला गती

* रविवारी ऑनलाईन परीक्षा

पुणे :

कसबा विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांमुळे गेल्या जवळपास एक वर्षापासून रखडलेली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. निवडणुकीचे अडथळे दूर झाल्यानंतर रविवारी (ता. २५) या पदासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
महापालिकेत विविध श्रेणीतील हजारो पदे रिक्त असूनही भरती प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून अपेक्षित गती मिळत नव्हती. विशेषतः अभियंता संवर्गातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त जागांमुळे विकासकामे आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होत होता. भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेने सन २०२२-२३ मध्ये विविध पदांच्या एकूण ७४८ जागांची भरती केली होती. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ११३ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, मराठा आरक्षणासंबंधी निर्णय, शासनाची मंजुरी, तसेच ‘आयबीपीएस’ संस्थेसोबतचा करार संपुष्टात आल्याने ही प्रक्रिया अडचणीत सापडली होती. नंतर ‘आयबीपीएस’सोबत नव्याने करार झाल्यानंतर उमेदवारांना अर्जात दुरुस्तीची संधी देण्यात आली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिकेने परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. एक डिसेंबरला परीक्षा होणार होती; मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळे ती पुढे ढकलण्यात आली. १५ डिसेंबरची तारीख ठरवण्यात आली होती; परंतु महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने परीक्षा पुन्हा पुढे ढकलावी लागली. अखेर आता परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परीक्षेचा आढावा
एकूण जागा : १६९
महसुली विभाग : ६
परीक्षा होणारे जिल्हे : २०
परीक्षा केंद्रे : ६९
आलेले अर्ज : ४१,२७३
पुण्यात नऊ केंद्रांवर परीक्षा राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ही ऑनलाईन परीक्षा होणार असून, पुणे शहरात नऊ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान काही अडचण आल्यास उमेदवारांनी १८०० २२२ ३६६ किंवा १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय थोरात यांनी केले आहे.

आणखी वाचा   पुणे शहराला सर्वोत्तम करण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ