पुणे–मुंबई हेलिकॉप्टर प्रवास महागला;

* मार्ग बदलून वेळ वाढला तरी प्रवाशांचा ओघ कायम

पुणे :

देशातील सर्वाधिक व्यस्त हेलिकॉप्टर मार्गांपैकी एक असलेल्या पुणे–मुंबई हेलिकॉप्टर सेवेच्या मार्गात बदल झाल्याने प्रवासाचा वेळ सुमारे १२ मिनिटांनी वाढला आहे. या बदलाचा थेट परिणाम भाड्यावर झाला असून, पुणे–मुंबई–पुणे या दुहेरी प्रवासासाठी तब्बल ७० हजार रुपयांची भाडेवाढ झाली आहे. मात्र, वाढीव भाड्याचा प्रवाशांच्या प्रतिसादावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून कार्यान्वित झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे–मुंबई दरम्यान उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी नवीन हवाई मार्ग निश्चित केला आहे. हा मार्ग पूर्वीच्या तुलनेत अधिक लांब असल्याने हेलिकॉप्टरला वळसा घालून जुहू किंवा महालक्ष्मी येथील हेलिपॅडवर उतरणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी तसेच इंधन खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम भाड्यावर झाला आहे.
*  नवीन हवाई मार्गांची रूपरेषा
नवीन मार्गांनुसार हेलिकॉप्टरची उड्डाणे नवी मुंबई विमानतळाच्या हवाई क्षेत्रालगतून होत असून, काही ठिकाणी प्रतीक्षा (होल्डिंग) करावी लागत आहे. कर्नाला किल्ला, जेएनपीटी रस्ता, खारघर, डी. वाय. पाटील स्टेडियम, अटल सेतू, शिवडी परिसर अशा विविध ठिकाणांवरून मार्ग निश्चित करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार पर्यायी मार्गांचाही वापर केला जात आहे.
* भाड्यात लक्षणीय वाढ
पूर्वी सहा आसनी हेलिकॉप्टरसाठी पुणे–मुंबई–पुणे प्रवासाचे भाडे ३ लाख ८० हजार रुपये (जीएसटी वगळून) होते. नव्या मार्गानंतर हे भाडे वाढून ४ लाख ५० हजार रुपये (जीएसटी वगळून) झाले आहे. या भाड्यात दोन तासांचा थांबा समाविष्ट असून, त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही.
* सेवेला पसंती कायम
प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढूनही प्रवाशांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचे सेवा पुरवठादारांकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षितता, वेळेची बचत आणि आरामदायी प्रवास यामुळे हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय प्रवाशांकडून प्राधान्याने निवडला जात आहे.
“मार्ग बदलल्यामुळे अंतर आणि भाडे वाढले असले तरी प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे. जलद आणि सुरक्षित प्रवास हीच आमच्या सेवेची मोठी जमेची बाजू आहे,” अशी माहिती ईश्वरचंद्र गुलगुले, व्यवस्थापकीय संचालक, कैगु एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी दिली.

आणखी वाचा   जिल्हा परिषद निवडणुकीत पुण्यात भाजप विरोधात राष्ट्रवादी मोठी लढत