पालिकेच्या संकेतस्थळावरून ५७ देशांतून थेट निकाल पाहण्याचा विक्रमी प्रतिसाद

पुणे :

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याशी जगभरात स्थायिक झालेल्या पुणेकरांची नाळ अजूनही घट्ट जोडलेली असल्याचे महापालिका निवडणूक निकालाच्या दिवशी स्पष्ट झाले. जगाच्या विविध कोपऱ्यांत राहणाऱ्या पुणेकरांनी मोठ्या उत्सुकतेने महापालिकेच्या निकालाचे थेट अपडेट पाहिल्याचे समोर आले आहे.
यंदा प्रथमच पुणे महापालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट उपलब्ध करून दिले होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निकालाच्या दिवशी तब्बल ७ लाखांहून अधिक नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देत सुमारे ४१ लाख वेळा निकालाची माहिती पाहिली. विशेष म्हणजे ही माहिती जगातील तब्बल ५७ देशांमधून पाहिली गेली, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युएई, नॉर्वे, हाँगकाँग, नेदरलँड्स यांसह युरोप, आशिया आणि मध्यपूर्वेतील अनेक देशांतून पुणेकरांनी निकालाचे थेट अपडेट पाहिले. तसेच फिनलंड, जपान, फ्रान्स, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, न्यूझीलंड, स्पेन, थायलंड, पोलंड, चीन, ब्राझील, श्रीलंका, तैवान आदी देशांमधूनही संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात भेटी नोंदवण्यात आल्या.
निकालाच्या प्रक्रियेसाठी महापालिकेने १५ मतमोजणी केंद्रांवर स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले होते. प्रभागनिहाय आणि फेरीनिहाय मतमोजणी, आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवारांची माहिती थेट संकेतस्थळावर प्रसारित केली जात होती. मिडिया सेल आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयातून ही यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात आली.
महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त राहुल जगताप यांनी सांगितले की, “यंदा पहिल्यांदाच निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. प्रभागनिहाय सविस्तर माहितीमुळे जगभरातील ५७ देशांमधील नागरिकांनी पुणे महापालिकेचा निकाल आवर्जून पाहिला. यामुळे पुणेकरांचे शहराशी असलेले भावनिक नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.”

आणखी वाचा   दहावीची रणधुमाळी; १६ लाखांहून अधिक विद्यार्थी सज्ज