पुणे :



महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेली पक्षांतराची लाट आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही जोर धरताना दिसत आहे. जागोजागी रात्री उशिरापर्यंत बैठका, गुप्त वाटाघाटी आणि तह सुरू असून, जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे.
पुणे जिल्हा परिषद काबीज करण्याच्या दृष्टीने भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाले आहेत. भाजपने काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश करून घेत आपली ताकद वाढवली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
जुन्नर तालुक्यातही मोठ्या हालचाली घडल्या असून, शिवसेना (ठाकरे गट) चे तालुका प्रमुख माउली खंडागळे आणि उपतालुका प्रमुख मोहन बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, सर्व आठ जिल्हा परिषद मतदारसंघात धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी धक्का देत जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांचे निकटवर्तीय युवानेते अजिंक्य घोलप यांनी पत्नीसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे, खेड तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, इंदापूरचे नेते प्रदीप गारटकर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षांतरांचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येत शिवसेना (ठाकरे गट) सोबत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आंबेगाव तालुक्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे तालुकानिहाय वेगवेगळी राजकीय आघाडी तयार होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज, २१ जानेवारी असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पक्षांकडून अद्याप एबी फॉर्म न मिळाल्याने शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राजकीय उलथापालथींच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

















