निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा ; पुण्यात कनिष्ठ अभियंत्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई

पुणे :
पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिस्तभंगाविरोधात कडक पावले उचलली असून, निवडणूक कामासाठी नेमणूक असूनही कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
कोंढवा–येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भरारी पथकात गाडीवडर यांची नियुक्ती करण्यात आली होती. दि. २५ डिसेंबर रोजी संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष कारवाईसाठी उपस्थित राहणे अपेक्षित असताना त्या हजर न राहिल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून, प्रशासनाला पर्यायी पथकाची तातडीने नेमणूक करावी लागली.
निवडणूक प्रक्रिया ही राष्ट्रीय कर्तव्याच्या स्वरूपाची असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदी व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, आदेश असूनही कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी शिस्तभंगाची गंभीर दखल घेत गाडीवडर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले असून, निवडणूक कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

आणखी वाचा   भाजपमध्ये इनकमिंगला वेग ; माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांचा प्रवेश