5 वी खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, राजस्थान 2025

-महाराष्ट्राच्या मुलींचा पदकांचा धडाका

पुणे :
पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी जबरदस्त कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. आर्चरीपासून वेटलिफ्टिंग, जलतरण आणि ज्यूदोपर्यंत प्रत्येक मैदानात राज्याच्या मुलींनी आपली छाप उमटवली.

* आदिती स्वामीचा सुवर्णवेध

शिवाजी विद्यापीठाची विश्वविजेती धनुर्धारी आदिती स्वामी हिने कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या खेळाडूला 147-143 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले.

* गीतांजली जगदाळेचा विक्रमी उंचाव

वेटलिफ्टिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गीतांजली जगदाळे हिने 63 किलो गटात 167 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवले. खेळो इंडियातील हे तिच्या कारकिर्दीतील पहिलेच पदक.

* वैष्णवी पवारचा दमदार पराक्रम

आहिल्यानगरच्या भाजी विक्रेत्याची मुलगी असलेल्या वैष्णवी पवार हिने 80 किलो वेटलिफ्टिंग गटात रौप्य पदक पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी वैष्णवीने खेलो इंडिया स्पर्धेत पदकाची परंपरा कायम ठेवली. जलतरणात दिक्षा यादवची ‘पंचक’ कामगिरी

* जलतरणात दिक्षा यादवची ‘पंचक’ कामगिरी

दिक्षा यादवने एकूण 5 पदके जिंकत राज्याची शान वाढवली –

1500 मी. फ्रीस्टाईल – रौप्य

200 मी., 800 मी. फ्रीस्टाईल, फ्रीस्टाईल व मिडले रिले – कांस्य

* हमालाची मुलगी भक्ति वाडकरचा चार पदकांचा चौकार

कोल्हापूरच्या राधानगरी येथील हमालाच्या मुलीने, भक्ति वाडकरने, 4 पदकांचा इतिहास रचला –

50 मी. बॅकस्ट्रोक – रौप्य

200 मी. बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल रिले, मिडले रिले – कांस्य

गत आसाम स्पर्धेत 5 पदक मिळवलेल्या भक्तीने यंदाही तितकाच दमदार खेळ केला.

* संस्कृती पाटीलचे ज्यूदोतील कांस्य

शिवाजी विद्यापीठाची संस्कृती पाटील हिने 78 किलो गटात कांस्य पटकावले. कुस्तीचा घरगुती वारसा असणाऱ्या संस्कृतीने ज्यूदोमध्ये चमकदार कामगिरी साकारली.

* महाराष्ट्राच्या मुलींचा ‘मेडल स्टॉर्म’

एका दिवसात मिळालेल्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा ठसवून दिले आहे.

आणखी वाचा   आचार्य आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपूल सज्ज