भाजपची उमेदवार यादी तीन टप्प्यांत ; बंडखोरी टाळण्यासाठी रणनीती

पुणे :
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून, महायुतीतील जागा वगळता सुमारे १४० ते १४५ उमेदवारांची प्राथमिक यादी जवळपास अंतिम केली आहे. मात्र, ही संपूर्ण यादी एकाचवेळी जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाने उमेदवार यादी तीन टप्प्यांत जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पहिली उमेदवार यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता असून, उर्वरित दोन याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या रणनीतीमागे नाराज इच्छुकांना सावरून घेणे आणि बंडखोरी रोखणे, हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सुमारे ३० ते ४० माजी नगरसेवकांना यावेळी डावलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाराज नेते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा संभाव्य पक्षांतराला आळा घालण्यासाठीच भाजपने उमेदवार जाहीर करण्याची ही टप्प्याटप्प्याची खेळी आखल्याचे बोलले जात आहे.
पुण्यातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी शहरातील भाजप पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुक्कामाला होते. शुक्रवारी सायंकाळी या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, बहुतांश उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पुण्यात परतल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून काही उमेदवारांना प्रचार सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात केली असून, पहिल्या यादीत सुमारे ४० ते ६० उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा   हडपसर–मांजरी रस्त्यावर भीषण अपघात