व्याजाच्या पैशावरून सूडनाट्य; अत्याचार, अश्लील व्हिडिओची धमकी देत खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट उधळला

पुणे :

व्याजाने घेतलेली रक्कम परत करूनही त्रास देण्याच्या उद्देशाने एका महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून इतर काही जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रताप रमेश जाधव (वय ४५) आणि त्याची पत्नी पल्लवी प्रताप जाधव (वय २८, रा. भिंताडेनगर, सिंहगड कॅम्प) यांचा समावेश आहे. या प्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती-पत्नींसह एका वकिलासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हा प्रकार जून २०२४ पासून आतापर्यंत सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

मैत्रीचा गैरफायदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पल्लवी या परस्पर मैत्रिणी आहेत. फिर्यादीने काही काळापूर्वी प्रताप जाधव याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. संबंधित रक्कम परतफेड करूनही आरोपींकडून पैशांची पुनःपुन्हा मागणी केली जात होती.

दरम्यान, पल्लवी घरात नसताना प्रताप जाधव याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार देण्यासाठी महिला पोलिसांकडे जाणार असताना आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी करत दबाव वाढविला.

धमक्या आणि आमिषाचा खेळ

फिर्यादीने अधिक पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पती-पत्नीने तिच्यावर दबाव टाकण्याचे षड्यंत्र रचल्याचे समोर आले आहे. पल्लवीच्या उपस्थितीत पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर महिलेचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

इतकेच नव्हे तर, एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसे केल्यास २० ते २५ लाख रुपये आणि एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, फिर्यादीने यास नकार दिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आणखी वाचा   भाजपमध्ये तिकीट वाटपाने पुण्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला उघड उघड संताप व्यक्त

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत असून, इतर आरोपींच्या भूमिकेचा शोध घेतला जात आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.