बिबवेवाडीत भीषण दुर्घटना

* भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू; निष्काळजी ठेकेदारावर गुन्हा

पुणे :

बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिथुन नारायण चव्हाण (वय ३४, रा. महावीरनगर, सुखसागरनगर, कात्रज) असे मृत मजुराचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी श्रीदेवी चव्हाण (वय २१, मूळ रा. किनीमोड तांडा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगरमध्ये एका घराचे बांधकाम सुरू होते. हे काम ठेकेदार राठोड याच्याकडे देण्यात आले होते. भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली आणि राडारोड्याखाली चव्हाण अडकले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करणे, तसेच कामगारांना सुरक्षाविषयक साधने उपलब्ध न करून देणे याबाबत ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.

येरवड्यात अपघात

पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील तरुण ठार

येरवडा परिसरात दुचाकी घसरून पडल्याने पाठीमागून येणाऱ्या पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विकी महातो (वय २२, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत दुचाकीस्वार सुभाष दादू कांबळे (वय ५१, रा. गुरुकृपा कॉम्प्लेक्स, शितळादेवी चौक, गुरुवार पेठ) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास कांबळे व महातो हे येरवड्यातून जात असताना मेट्रो मार्गिकेजवळ अचानक समोर आलेल्या रिक्षेमुळे दुचाकी घसरली. दोघेही रस्त्यावर पडले असताना पाठीमागून येणाऱ्या पीएमपी बसच्या चाकाखाली महातो सापडले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

आणखी वाचा   भाजपमध्ये इनकमिंगला वेग ; माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांचा प्रवेश