जगतापांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट)मध्ये नेतृत्वाचा पेच

* पुणे शहराध्यक्षपदी कोण?

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्याने शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित निर्णयानंतर पुणे शहराध्यक्षपदाची धुरा आता कोणाकडे सोपवायची, हा महत्त्वाचा प्रश्न पक्षासमोर उभा ठाकला आहे.
सलग दोन दिवस चाललेल्या घडामोडींनंतर बुधवारी जगताप यांनी राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीस अवघे १९ दिवस शिल्लक असताना पक्षाची संघटनात्मक यंत्रणा आणि प्रचाराची सूत्रे कोण सांभाळणार, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक रणनिती, सभा, मेळावे, प्रचाराचे नियोजन अशा सर्वच बाबींची जबाबदारी नव्या नेतृत्वावर येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक विशाल तांबे यांचे नाव चर्चेत आहे. तांबे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले असून, पक्षाने प्रचार किंवा कार्यालयीन स्वरूपाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही संवाद साधल्याचे समजते.
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रभारी शहराध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आली होती. मात्र, काकडे यांनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने पर्याय मर्यादित झाले आहेत.
नेतृत्वाच्या या रिक्ततेमुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, लवकरात लवकर निर्णय घेऊन संघटन मजबूत करण्याची गरज पक्षातील नेते व्यक्त करत आहेत. आगामी काही दिवसांत पुणे शहराध्यक्षपदाबाबत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   पुणे जिल्ह्यात स्मार्ट वीजमीटर बसवणीला वेग