पीएमपीएमएल बसमध्ये रील शूट केल्याने वाद

* सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सुदामेला महामंडळाची कडक नोटीस

पुणे :

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमध्ये नियमबाह्य पद्धतीने रील शूट करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी महामंडळाने एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला कडक नोटीस बजावली आहे. बससेवेचा गैरवापर, अधिकृत साहित्याचा बेकायदेशीर वापर आणि महिला प्रवाशांच्या सन्मानाला बाधा पोहोचवल्याचा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पीएमपीएमएलच्या बसमध्ये चित्रीकरण केले. या व्हिडिओमध्ये बसमधील अधिकृत गणवेश, ई-तिकीट मशीन तसेच ओळख पटवणारी बॅच यांचा अनुचित वापर केल्याचे आढळून आले. यामुळे महामंडळाच्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाले असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, सदर रीलमध्ये महिला प्रवाशांचे चित्रण आक्षेपार्ह पद्धतीने झाल्याचा आरोप महामंडळाने केला आहे. अशा प्रकारच्या मजकुरामुळे महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोच, शिवाय सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महामंडळाने संबंधित इन्फ्लुएंसरला तत्काळ आक्षेपार्ह रील सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात पीएमपीएमएलच्या बससेवा, मालमत्ता किंवा कर्मचारी यांच्याशी संबंधित कोणतेही छायाचित्रण, व्हिडिओ किंवा मजकूर प्रसारित करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत मुख्य कार्यालयात लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विहित मुदतीत स्पष्टीकरण न दिल्यास किंवा आदेशांचे पालन न केल्यास, संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पीएमपीएमएलने दिला आहे.

आणखी वाचा   पुणे जिल्ह्यात स्मार्ट वीजमीटर बसवणीला वेग