पुणे:



महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित लढण्याच्या हालचाली सुरू असतानाच, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
प्रशांत जगताप हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता पुण्यातील टिळक भवन येथे त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या घडामोडीमुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला बळ मिळणार असल्याचे संकेत आहेत.

















