पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

पुणे:

महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अलीकडे पार पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांनंतर पक्षांतरांची मालिका सुरूच असून, महायुतीत विशेषतः भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना इनकमिंगचा फायदा होताना दिसत आहे. या घडामोडींचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकांतील महायुतीच्या यशानंतर महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षांकडे वाटचाल केली. त्यातच आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आज आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला पुण्यात आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

यापूर्वीच माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी मनसे व शिवसेना ठाकरे गट युतीची घोषणा होऊन अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच पक्षांतर्गत गळती सुरू राहिल्याने ठाकरे गटासमोरील आव्हाने वाढताना दिसत आहेत.

आणखी वाचा   ससून रुग्णालयाची जागतिक वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक झेप