महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार अचानक गायब

पुणे:

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठकींसाठी मुक्कामाला असलेले अजित पवार कोणालाही पूर्वकल्पना न देता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक निघून गेल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून अजित पवार पुण्यात विविध राजकीय बैठकींमध्ये सक्रिय होते. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. जागावाटपाबाबत प्राथमिक सहमती झाल्याचे संकेत असतानाच, निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावरून या चर्चांना अडथळा आल्याचे समजते. ही चर्चा फिसकटल्यानंतरच अजित पवार यांनी बारामती हॉस्टेलमधून अचानक प्रस्थान केल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलीस बंदोबस्त, पायलट कार आणि सरकारी ताफा हॉस्टेल परिसरातच थांबलेला दिसून आला. अजित पवार एकटेच निघून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर ते नेमके कुठे गेले, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

आणखी वाचा   महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा मोहिमेला सुरूवात