पुणेकर सुज्ञ आहेत, मतपेटीतून योग्य उत्तर देतील’ – केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे :

गेले १५–२० दिवस सुरू असलेल्या प्रचाराची धामधूम आज संपली असून आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणेकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

मोहोळ म्हणाले, “मागील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ती कामे पुणेकरांनी प्रत्यक्ष पाहिली आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात आले. या कामांवर विश्वास ठेवून पुणेकर पुन्हा एकदा भाजपाला पूर्ण पाठिंबा देतील, असा मला ठाम विश्वास आहे.”

ते पुढे म्हणाले, “संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी घराबाहेर पडून मतदान करावे.”

या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. यासंदर्भात बोलताना मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “मी कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही. मात्र काही गोष्टी समोर आल्यानंतर त्यावर बोलावे लागते. पुणेकर हे सुज्ञ आणि जाणकार मतदार आहेत. ते विचारपूर्वक मतदान करतात.”

ते म्हणाले, “या निवडणुकीत काही ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमकडून अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला. साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर झाला, मात्र पुणेकर या सगळ्या गोष्टींना मतपेटीतून योग्य उत्तर देतील.”

“आम्ही केलेले कामच आमची खरी ताकद आहे. २०१४ पासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य सरकारने पुण्यासाठी अनेक योजना व प्रकल्प मंजूर केले. महापालिकेत पाच वर्षे केलेले काम लोकांसमोर आहे,” असेही मोहोळ यांनी नमूद केले.

आणखी वाचा   पुणे महापालिका निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधित्वाचा मुद्दा ऐरणीवर