मुंबई–पुणे प्रवासात मोठा दिलासा! ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ९३% पूर्ण, मे २०२६ पर्यंत वाहतुकीस खुला होण्याची शक्यता

पुणे :

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एक्स्प्रेस वेवरील बहुप्रतिक्षित आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून या प्रकल्पाचे तब्बल ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) देखरेखीखाली सुरू असलेला हा मार्ग मे २०२६ पर्यंत सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे घाट परिसरातील सुमारे १३.३ किलोमीटरचा अवघड आणि वेळखाऊ प्रवास टाळता येणार असून मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. परिणामी वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि खर्च वाचणार आहे.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या १८१ मीटर उंच दरीपुलाचे बांधकाम करण्यात आले असून हे प्रशासनासाठी मोठे तांत्रिक आव्हान होते. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात १.६८ किलोमीटर आणि ८.८७ किलोमीटर लांबीचे दोन अत्याधुनिक बोगदे उभारण्यात आले आहेत. सध्या पुलाचे दोन्ही मार्ग जोडणे, केबल बसवणे आणि अंतिम संरचनात्मक कामे वेगाने सुरू आहेत.

नव्या मार्गामुळे पुणे किंवा सातारा बाजूने येणारे प्रवासी जेएनपीए रोडच्या माध्यमातून पनवेल शहरात प्रवेश न करता थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सहज पोहोचू शकणार आहेत. पुणे ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास अवघ्या २ तास १५ मिनिटांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांसह व्यावसायिक वाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे.

आणखी वाचा   राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित सुमारे ८० हजार शाळा आज बंद