भाजपवर धंगेकरांचा घणाघात ; युती फसवणुकीचा आरोप

* पुण्यात राजकीय वादळ

पुणे :

पहिल्याच दिवसापासून ही मंडळी शिवसेनेला फसवणार, हे मला माहीत होतं,” असा गंभीर आरोप करत शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. युतीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत गाफील ठेवल्यामुळे एबी फॉर्म वेळेत पोहोचवता आले नाहीत, परिणामी शिवसेनेला अपेक्षित १६५ ऐवजी केवळ ११० उमेदवारच रिंगणात उतरवता आल्याचे त्यांनी सांगितले.

महायुती होण्याची शक्यता असताना जागावाटपावर तोडगा न निघाल्याने अखेर शिंदे सेनेने भाजपपासून फारकत घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे. धंगेकर यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावरही जोरदार टीका केली.

“पुणे शहर भाजपचे नेतृत्व मंगळसूत्र चोराकडे देण्यात आले आहे, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे,” असा खळबळजनक आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही स्थानिक नेत्यांनी फसवल्याचा दावा केला. भ्रष्टाचार आणि पैशांची लालसा असलेले नेतृत्व पुणेकर कधीच स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या लोकांमुळे कार्यकर्त्यांची ताकद कमी होत चालल्याचा आरोप करत, “खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची क्षमता फक्त शिवसेनेकडेच आहे,” असा दावाही धंगेकर यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत बोलताना, “ते राज्यस्तरीय नेते आहेत, मात्र सत्तेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असू शकते,” असे सूचक विधान त्यांनी केले. येत्या १६ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातून चांगली भेट देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच वेळी त्यांनी अजित पवार यांचे कौतुक करत भाजपवरची टीका अधिक तीव्र केली.

या आरोपांमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणखी वाचा   पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का