बोपदेव घाट सात दिवसांसाठी बंद; सासवड–पुणे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा सल्ला

पुणे :

सासवड आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला बोपदेव घाट आजपासून पुढील सात दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, बुधवार, १४ जानेवारीपर्यंत घाटातून कोणतीही वाहतूक सुरू राहणार नाही.

बोपदेव घाट परिसरात सध्या रस्त्याची मजबुतीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. या कामाचा दर्जा, सुरक्षितता आणि वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण घाट मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

घाट बंद असल्याने वाहनचालकांनी बोपदेव घाटाच्या दिशेने जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाट या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचवले आहे.

बोपदेव घाट हा केवळ सासवड–कोंढवा मार्गावरील प्रवाशांसाठीच नव्हे, तर पुरंदरसह परिसरातील अनेक तालुक्यांसाठी महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा   स्वीकृत नगरसेवकपदावरून पक्षांतर्गत धुसफूस; नेत्यांची कोंडी वाढली