वाघोलीत कचर्यातून सापडली सोन्याची अंगठी; रेखा साकटच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

पुणे:

घरातील चुकून गेलेली सोन्याची अंगठी पुन्हा मालकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये वाघोलीतील रेखा साकट या कचरावेचक महिलेचे प्रामाणिकपण चमकून दिसले. विजय विहार सोसायटीतील नागरिक सध्या त्यांच्या या कार्याचा आदर व्यक्त करत आहेत.
सोसायटीतील एका कुटुंबाचे जुन्या सामानासह सोन्याची अंगठी कचऱ्यात गेल्याचे संध्याकाळी लक्षात आले. त्याआधी रेखा साकट यांनी कचरा महापालिकेच्या मोठ्या कंटेनरमध्ये टाकला होता. रात्री असल्याने अंगठी शोधणे अशक्य ठरले, परंतु ‘स्वच्छ’ संस्थेच्या समन्वयक पौर्णिमा ओव्हाळ यांनी तातडीने महापालिकेच्या प्रशासनाला कंटेनर हलवू नका, अशी विनंती केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून शोधकार्य सुरु झाले. रेखा साकट यांनी स्वतः कंटेनरमध्ये उतरून हाताने कचऱ्याच्या पिशव्या तपासल्या आणि नागरिकांना व्हिडिओ कॉलवर दाखवत प्रत्येक वस्तूची खातरजमा केली. तब्बल ५ टन कचरा आणि शेकडो पिशव्या तपासल्यानंतर अखेर सोन्याची अंगठी सापडली.
पौर्णिमा ओव्हाळ आणि रेखा साकट यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, विजय विहार सोसायटीतील नागरिक त्यांचा अभिमान व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा   गुंड गजा मारणेची पत्नी अजीत पवारांच्या भेटीला