पुणे :



आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, दोन्ही पक्षांतील चर्चांचे फेरे सुरूच आहेत. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या जागांच्या मागणीवर भाजपकडून ठोस सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याने महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसते.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील प्रमुख नेते रवींद्र धंगेकर यांची नाराजी उघडपणे समोर येत आहे. जागावाटपात शिवसेनेला दुय्यम व निवडणूकदृष्ट्या कमकुवत प्रभाग दिले जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या वादामुळे धंगेकर आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी रंगली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण चांगलेच गाजले होते. अखेर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला असला तरी, या घटनेनंतर धंगेकरांना महापालिका निवडणुकीत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
या परिस्थितीमुळे धंगेकर कुटुंबाकडून स्वतंत्र राजकीय पाऊल उचलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर हा प्रभाग क्रमांक २४ मधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतील मतभेद आता केवळ चर्चेपुरते न राहता निवडणूक रणांगणातही दिसण्याची चिन्हे आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर निवडणूक कोणासाठी लढवायची, हा प्रश्न आहे. भाजपने शिवसेनेला दिलेला जागावाटपाचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. ज्या जागा ऑफर केल्या आहेत, त्या ठिकाणी आजवर कोणीही निवडून आलेले नाही. अशा जागा स्वीकारून काय साध्य होणार?”
या घडामोडींमुळे पुण्यातील महायुतीचे राजकारण अधिकच तापले असून, आगामी निवडणुकीत कोणती नवी समीकरणे तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















