सांडपाणी वाहिनीच्या कामाचा बहाणा; ज्येष्ठ नागरिकाला पावणेसात कोटींना गंडा

पुणे :

सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे कंत्राट असल्याचा बनाव करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
संदीप उर्फ सोनू उर्फ आदित्य चव्हाण उर्फ ठाकूर (वय ४०, मूळ रा. विकासनगर, देहूरोड; सध्या रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी चार जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण पेठेत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या आईच्या नावे नवी पेठेत घर असून ते भाडेतत्त्वावर दिलेले आहे. मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने तक्रारदारांशी संपर्क साधून पुणे महापालिकेत सांडपाणी वाहिन्यांची कंत्राटी कामे करत असल्याचे भासवले. घराजवळील सांडपाणी वाहिनीत झाडांची मुळे शिरल्याने स्वतंत्र लाईन टाकावी लागेल, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला.
पालिकेची परवानगी, चलन भरणे, यंत्रसामग्रीचा खर्च, मुलाची शस्त्रक्रिया, न्यायाधीशांच्या मुलाच्या निधनासारखी भावनिक कारणे देत आरोपीने वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्या. दोन वर्षांच्या कालावधीत तक्रारदारांना धमकावत व दबाव टाकत आरोपीने एकूण ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये उकळल्याचे उघड झाले आहे.
या व्यवहारात आरोपीच्या साथीदारांनीही फोनवरून तक्रारदारांशी संपर्क साधून पैसे देण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही टोळी संघटित पद्धतीने कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सरकारी वकील अमर ननावरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करत सखोल तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास विश्रामबाग पोलिसांकडून सुरू आहे.

आणखी वाचा   भाजप–शिवसेनेसमोर अर्जमाघारीचे मोठे आव्हान