पुणे :



वानवडी प्रभाग क्रमांक १८ मध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणतीही पूर्वसूचना न देता ईव्हीएम मशीन गुपचूप आणण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून, संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
जगताप यांनी यासंदर्भात पुणे महापालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन दिले आहे. प्रभागातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन कधी, कशा आणि कोणाच्या उपस्थितीत आणण्यात आल्या, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी त्यांनी केली असून, गेल्या २४ तासांतील सीसीटीव्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ईव्हीएम मशीन मतदारसंघात दाखल होताना सर्व उमेदवारांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असते. मशीनची सील, बॅटरीची स्थिती आणि कार्यक्षमता उमेदवारांच्या उपस्थितीत तपासूनच ती स्ट्राँगरूममध्ये ठेवली जाते. मात्र वानवडी प्रभागात हे सर्व नियम डावलण्यात आल्याचा आरोप जगताप यांनी केला.
गेल्या दोन दिवसांपासून स्ट्राँगरूम परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला गेला किंवा फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, “पुणेकरांचा कौलच अंतिम आहे. मतदारांनी योग्य उमेदवार निवडावा, मात्र कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा फसवणूक होऊ नये. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शक भूमिका घ्यावी,” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.

















