पुणे :



पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जागावाटपाचा प्रश्न शेवटपर्यंत न सुटल्याने आणि भाजपने सर्वच्या सर्व १६५ जागांवरील उमेदवार जाहीर केल्याने पुण्यातील निवडणूक रणधुमाळी आता अधिकच रंगतदार झाली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी आणि ठाकरे शिवसेना–मनसे अशी चौरंगी लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी पुण्यात केली होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यापासून दोन्ही पक्षांत जागावाटपावर चर्चा सुरू होत्या. शिवसेनेने ४० ते ४५ जागांची मागणी केली होती; मात्र भाजप केवळ ८ ते १० जागा देण्याच्या भूमिकेवर ठाम होता. चर्चेच्या पुढील टप्प्यात भाजपने १५ जागांची तयारी दर्शविली, पण शिवसेनेने किमान २५ जागांचा आग्रह धरला. त्यातच काही महत्त्वाच्या जागांवर भाजपने माघार न घेतल्याने दोन्ही पक्षांतील दरी अधिकच वाढली.
युती तुटल्याचे खासगीत सांगितले जात असतानाच, वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असे संकेत दिले जात होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अंतिम चर्चा न झाल्याने संभ्रम कायम राहिला. अखेर भाजपने गुरुवारी सर्व १६५ जागांवरील उमेदवार जाहीर करत युती संपुष्टात आल्यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले. अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी राजकीय वास्तव स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षांसाठी हा कसोटीचा ठरला आहे. १६५ जागांसाठी तीन हजारांहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत केवळ मर्यादित उमेदवारांनीच माघार घेतली आहे. भाजप आणि शिवसेनेत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. अनेक प्रभागांत थेट आमने-सामने लढतीची शक्यता असून, काही ठिकाणी बंडखोर उमेदवार समीकरणे बिघडवू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत संघर्ष दिसून येत असून, बंडखोरी रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार गटाकडून मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहिल्याने अजित पवार गटाची अडचण वाढली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेला तुलनेने कमी बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. मात्र मनसेसोबतच्या जागावाटपावरून काही ठिकाणी तणाव निर्माण झाला असून, त्यावर चर्चा सुरू आहे.
एकूणच, पुणे महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. आज सायंकाळपर्यंत किती उमेदवार माघार घेतात आणि अंतिम लढतींचे चित्र कसे असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















