पुणे महापालिकेत उद्धव ठाकरे गटाला धक्का

* एका जागेवरच ‘मशाल’ची ज्योत

पुणे –

महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पुण्याकडे दुर्लक्ष केल्याने, स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि प्रचारातील विस्कळितपणा याचा थेट परिणाम मतदारांवर झाला. काँग्रेस आणि मनसेसोबत आघाडी करूनही अपेक्षित यश मिळवण्यात पक्ष अपयशी ठरला. परिणामी, यंदाच्या निवडणुकीत पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
२०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना एकसंध असताना पक्षाने १० जागांवर विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर पक्षात झालेली फूट, पक्षचिन्हाचा प्रश्न आणि अंतर्गत अस्थिरता यामुळे संघटन कमकुवत झाले. निवडणुकीपूर्वी आणि ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाचे दहाही नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने शिवसेनेची ताकद पूर्णतः ढासळली.
यंदाच्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. हा पराभव शिवसेनेच्या स्थापनेपासून आजवरचा पुणे महापालिकेतील सर्वात खराब निकाल मानला जात आहे.
या निवडणुकीत कल्पना थोरवे, माजी आमदारांचे पुत्र प्रसाद बाबर आणि रूपेश मोरे यांना पराभव स्वीकारावा लागला. शहरप्रमुख संजय मोरे यांनी स्वतः निवडणूक रिंगणात उतरून पक्षाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनाही पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
काँग्रेस आणि मनसेसोबत युती करूनही त्याचा राजकीय फायदा करून घेण्यात पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले. वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती, विस्कळित संघटन आणि प्रभावी नेतृत्वाचा अभाव यामुळेच हा पराभव ओढवला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या निकालानंतर पक्षासमोर मोठे आत्मपरीक्षण उभे ठाकले आहे. ‘मशाल’ पुन्हा तेजस्वी करण्यासाठी सुरुवातीपासून संघटनात्मक बांधणी, स्थानिक नेतृत्व उभे करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काळात पक्ष कोणती पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आणखी वाचा   पुणे–अबू धाबी थेट उड्डाणसेवेची एअर इंडिया एक्स्प्रेसकडून सुरूवात