१११ जागांवर आघाडी, महापौरपदासाठी नावांची जोरदार चर्चा



पुणे :
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत १११ जागांवर आघाडी घेत शहरातील राजकारणावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आकड्यांमध्ये किंचित बदल होण्याची शक्यता असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देण्यात भाजप पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट मिळून पुण्यात केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, पुणे महापौर निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, हे पद महिलेसाठी की पुरुषासाठी आरक्षित राहणार आणि कोणत्या प्रवर्गात जाणार, याबाबतची स्पष्टता येत्या काही दिवसांत होणार आहे.
महापौरपदासाठी ‘ही’ नावं आघाडीवर
आरक्षणाची अंतिम दिशा स्पष्ट होण्याआधीच भाजपमध्ये महापौर पदासाठी काही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गणेश बिडकर, राजेंद्र शिळमकर आणि धीरज घाटे ही तीन प्रमुख नावं सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
गणेश बिडकर यांच्या समर्थनार्थ निकालाआधीच शहरात बॅनरबाजी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजेंद्र शिळमकर हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक मानले जातात. तर भाजपचे शहराध्यक्ष असलेले धीरज घाटे यांनी यापूर्वी पालिकेत सभागृह नेते म्हणून जबाबदारी पार पाडली असून, त्यांचेही नाव महापौरपदासाठी गंभीरपणे घेतले जात आहे.
आरक्षणाच्या चौकटीत कोणते नाव पुढे येते आणि भाजप नेतृत्व नेमका कोणता निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
















