महापालिका रणधुमाळीत बंधू ठाकरे दूरच

* सत्ताधारी नेत्यांचा मात्र प्रचार धडाका

पुणे :

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापले असताना सत्ताधारी युतीतील नेत्यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेत जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते पदयात्रा, जाहीरसभा आणि बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

याच्या उलट, अस्तित्वाच्या लढाईत सापडलेल्या उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेच्या प्रचारात मात्र ठाकरे बंधूंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही दोन्ही नेत्यांनी संयुक्त प्रचारात उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील प्रचारासाठी ठोस संकेत मिळालेले नाहीत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तळ ठोकत प्रचारयंत्रणा अधिक वेगवान केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही नेत्यांची फौज पुण्यात दाखल होत असून, उमेदवारांसाठी बैठका, संवाद कार्यक्रम सुरू आहेत. शिंदेसेनेकडून उदय सामंत, डॉ. नीलम गोऱ्हे तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचारसभांना हजेरी लावली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात असतानाच, दोन्ही पक्षांची एकत्रित जाहीर सभा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीही संयुक्त सभा होणार नसल्याचे संकेत खुद्द पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. सत्ताधारी आघाडीच्या आक्रमक प्रचारासमोर ठाकरे बंधूंची भूमिका काय असेल, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   डेक्कन परिसरात महापालिकेचा धडक मोर्चा : पाच ट्रकभर साहित्य जप्त, पदपथ मोकळे