*महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘अनधिकृत हस्तक्षेप’ चर्चेत



पुणे :
महापालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच वाघोली परिसरातून एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. येथील एका नवनिर्वाचित महिला नगरसेविकेच्या पतीने थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत असून, यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला आहे.
प्रभागातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीत नगरसेविकेच्या पतीने अधिकाऱ्यांना आदेशात्मक स्वरूपात सूचना दिल्याचे या चित्रफितीत दिसून येते. बैठकीस संबंधित महिला नगरसेविका उपस्थित असल्या तरी प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि प्रश्नांची सरबत्ती ही त्यांच्या पतीकडूनच केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये प्रभागातील स्वच्छतेचे कंत्राट कोणत्या संस्थांकडे आहे, कोणत्या सोसायट्यांमधून कचरा उचलला जातो, साफसफाईची जबाबदारी कोणाची आहे, याबाबत तात्काळ माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यंदाच्या महापालिका निवडणुकीत महिलांचे संख्याबळ लक्षणीय वाढले असून तब्बल ९१ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. मागील सभागृहातही महिला नगरसेविकांनी विविध विषयांवर प्रभावी भूमिका बजावली होती. यंदा एकूण १०१ नवे सभासद सभागृहात प्रवेश करत असताना, अशा प्रकारच्या घटनांमुळे महिला सक्षमीकरणाच्या घोषणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या घटनेमुळे “नगरसेविका केवळ नावापुरत्या आणि प्रत्यक्ष कारभार पतीकडे” अशी टीका होत असून, महापालिका प्रशासनाने यावर काय भूमिका घ्यावी, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















