पुणे :



पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी नगरसेवक वसंत मोरे यांना पराभव स्वीकारावा लागला असून, या निकालानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोपांची झोड उठवली आहे. महापालिकेतील कारभार उघड होण्याच्या भीतीपोटीच प्रमुख पदांवर काम केलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांना जाणीवपूर्वक पाडण्यात आल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.
मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वतःसह तब्बल १८ माजी पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते तसेच विविध महत्त्वाच्या समित्यांवर काम केलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्वांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
“पुणेकरांनी एकदा विचार करावा की हे असे का घडवण्यात आले?” असा सवाल उपस्थित करत मोरे यांनी स्वतःच त्याचे उत्तर दिले आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महापालिकेत जो कारभार केला, तो वेळोवेळी उघड होईल, या भीतीनेच प्रमुख पदांवरील नगरसेवकांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा सारा प्रकार सत्ताधाऱ्यांनी आखलेल्या षडयंत्राचा भाग असल्याचेही मोरे यांनी म्हटले आहे.
या यादीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यासह अनेक अनुभवी नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, अश्विनी कदम, माजी गटनेते संजय भोसले, दिपाली धुमाळ, साईनाथ बाबर, अशोक हरणावळ, किशोर शिंदे, बाबू वागसकर यांचीही नावे आहेत.
याशिवाय स्थायी समिती सदस्य अविनाश बागवे, नंदाताई लोणकर, योगेश ससाने, नाना भानगिरे तसेच शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
“हे सर्वजण सभागृहात असते, तर सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराचा पाढा सातत्याने उघड झाला असता,” असा ठाम दावा वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
















