मुलाची धिंड काढल्याने आई-वडीलांचे टोकाचे पाऊल

पुणे:

रस्ता अडवून रस्त्यावरच वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या तरुणाला अटक केल्यानंतर त्याची धिंड काढल्याचा आरोप करत, संबंधित तरुणाच्या आई-वडिलांनी अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर घडली.

राज रविंद्र पवार याचा गुरुवारी (दि. 18) वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात जमले होते. यावेळी बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत रस्ता अडविण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ 13 जणांना अटक केली, तर राज पवारसह तिघे जण फरार झाले होते. फरार असलेल्या राज पवारला रविवारी पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर राज पवारला घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलिस घटनास्थळी घेऊन गेले होते.

यावेळी पोलिसांनी धिंड काढल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेचा राग मनात धरून राज पवारच्या आई-वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.आमच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणतेही चुकीचे कृत्य न करता देखील पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला आहे. आमच्या मुलाची विनाकारण धिंड काढण्यात आली. त्याला तात्काळ सोडून द्यावे, आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही दोघेही जीवन संपवू, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आणखी वाचा   नगरसेविका निवडून आली; पण वाघोलीत कारभार पतीकडे?