शीतल तेजवानी हिला अखेर अटक

पुणे:

मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवानी हिला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज दुपारी ही कारवाई केली. तेजवानी यांची अटक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.तेजवानी हिने मुंढव्यातील 40 एकर महार वतनी जमीन बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आहे. त्यासाठी तिने पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी कंपनीशी 300 कोटींचा व्यवहार केला. या जमिनीच्या 272 मालकांच्या वतीने ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ म्हणून तिने व्यवहार केला होता. प्रत्यक्षात ही जमीन राज्य सरकारची असून ती बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेकराराने देण्यात आली आहे. पोलिसांनी मागील महिन्यात दोन वेळा तेजवानी हिची चौकशी केली होती. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्या आधारे तिला अटक करण्यात आली.

आणखी वाचा   किरकोळ कारणांवरून वाढली हिंसक प्रवृत्ती; येरवडा हत्या प्रकरणांनी खळबळ