पुणे महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीत खळबळ

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

पुणे :

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचाली वेग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमवारी आपल्या पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या घडामोडीमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या दोन्ही गटांमध्ये संभाव्य युतीबाबत हालचाली सुरू आहेत. याच अनुषंगाने शरद पवार गटाकडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, शहराध्यक्ष असतानाही प्रशांत जगताप यांना या समितीत स्थान न मिळाल्याने नाराजी वाढल्याची चर्चा होती.
युतीबाबत असलेले मतभेद आणि समितीतून डावलल्याची भावना यामुळे जगताप अस्वस्थ होते. सोमवारी त्यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तथापि, अंतिम भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.
प्रशांत जगताप पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने करणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. मात्र, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा   नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळे यांचा प्रश्न, गडकरींचे एका वर्षात काम पूर्ण करण्याचे आश्वासन