राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बंडू आंदेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे :

पुण्यातील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बंडू आंदेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.विशेष म्हणजे, सध्या अटकेत असलेल्या आंदेकरला न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार, बंडू आंदेकरला कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन करता येणार नाही. अर्ज भरताना घोषणाबाजी करता येणार नाही. शिवाय गर्दी गोळा करण्यास मनाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकरला कडक पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं जाईल. इथं अर्ज भरल्यानंतर पुन्हा कोठडीत नेलं जाईल.

आज केवळ बंडू आंदेकरच नाही, तर आंदेकर कुटुंबातील इतर दोन सदस्यही अर्ज भरणार आहेत. यामध्ये बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर तिघांचा समावेश आहे. आज साडेअकरा वाजता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हे अर्ज दाखल केले जातील.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाने या तिन्ही उमेदवारांना हिरवा कंदील दिला आहे. मात्र, आंदेकर टोळीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पक्षाकडून या उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. कुठेही याची वाच्यता न करता थेट अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला सत्तेतील पक्षाने उमेदवारी दिल्याने आता पुण्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा   पुणेकरांनी विचार पूर्वक मतदार करावे