गेल्या २६ वर्षांपासून असलेली शरद पवारांची साथ अखेर जगतापांनी सोडली

पुणे –

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. गेल्या २६ वर्षांपासून असलेली शरद पवारांची साथ त्यांनी अखेर सोडली.

पुणे महापालिकेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होऊ नये अशी प्रशांत जगताप यांची मागणी होती. त्यामुळं ते नाराज होते, पण सुप्रिया सुळे या युतीबाबत ठाम भूमिका घेत असल्यानं अखेर प्रशांत जगताप यांनी पक्षातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रशांत जगताप यांची नाराजी दूर करण्यात सुप्रिया सुळेंना यश आलं नाही.

प्रशांत जगताप म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार! २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्याही पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार”

आणखी वाचा   काळवीटांचा एनडीए रोडवर मुक्तपणे संचार